मोरगिरी किल्ला
कित्येक दिवस मोरगिरी करायचा ठरवत होतो पण त्याची माहिती शक्यतो कुठेच मिळत नव्हती, पवन मावळातील हा किल्ला तसा अपरिचितच आहे..... नुकताच आमचा ट्रेकमित्र प्रसाद कुलकर्णी किल्ल्यावर जाऊन आला होता आणि त्याने योग्य अशी माहिती व्हाट्सएपच्या ग्रुपवर टाकली होती...शुक्रवारपर्यंत तसे काही जाण्याचा प्लॅन नव्हता पण अचानक हाच किल्ला करायचे ठरवले, नेहमीप्रमाणे शेवटी कुणाल आणि विनयच ट्रेकला आले..४-५ जणांनी स्वतः फोन करून सुद्धा आले नाही हे विशेष, पण हे काही नवीन नव्हते...
सकाळी कर्जतपर्यंत लोकलने आणि कर्जतवरून इंद्रायणी एक्सप्रेस पकडून लोणावळाला उतरायचे ठरवले..तेवढेच कर्जतपर्यंत बसून जायला मिळते 😉
लोणावळा स्टेशन वरून एसटी पकडण्यासाठी डेपोत ८.१५ वाजता शिरलो, 9.00 ची भांबुर्डे एसटी पकडायची असल्याने बराच वेळ होता, म्हणून पेटपूजा करण्यासाठी हॉटेल मध्ये गेलो तिकडे आम्हाला पवन आणि त्याचा मित्र भेटला, ते सुद्धा प्रिती पटेल बरोबर घाटवाटा करण्यासाठी आले होते, एसटी मध्ये आम्हाला जुने मित्र प्रिती, आदित्य आणि यज्ञेष भेटले, मग ट्रेकच्या गप्पा टप्पा सुरू झाल्या...
लोणावळा स्टेशन वरून एसटी पकडण्यासाठी डेपोत ८.१५ वाजता शिरलो, 9.00 ची भांबुर्डे एसटी पकडायची असल्याने बराच वेळ होता, म्हणून पेटपूजा करण्यासाठी हॉटेल मध्ये गेलो तिकडे आम्हाला पवन आणि त्याचा मित्र भेटला, ते सुद्धा प्रिती पटेल बरोबर घाटवाटा करण्यासाठी आले होते, एसटी मध्ये आम्हाला जुने मित्र प्रिती, आदित्य आणि यज्ञेष भेटले, मग ट्रेकच्या गप्पा टप्पा सुरू झाल्या...
![]() |
मोरगिरी किल्ला |
एसटीने आम्हाला घुसळखांब फाट्यावर सोडले, सगळ्यांचा निरोप घेऊन आम्ही किल्ल्याच्या मार्गाला लागलो, फाट्यावरून किल्ल्याचा पायथा हा साधारण ३ किमीवर आहे, किल्ल्यावर जायला ३ वाटा आहेत, पहिली वाट ही फाट्यावरून अंदाजे एक-दिड किमीवर असलेल्या गावातून जाते तिथे सह्याद्री प्रतिष्ठानने फलक लावला आहे, दुसरी वाट ही फाट्यावरून अंदाजे ५ -६ किमीवर असणाऱ्या मोरवे गावातून जाते आणि आम्ही जात होतो ती तिसरी वाट जी एस्सार ऍग्रोटेक कंपनीच्या समोरून जाते, तिसरी वाट ही किल्ल्यावर जरा लवकर दीड-दोन तासात घेऊन जाते.... फाट्यावरून चालायला सुरुवात केल्यावर आम्हाला लगेच एक लहान टेम्पो भेटला तो सुद्धा त्याच एस्सार कंपनीमध्येच जात होता.. त्यामुळे आम्ही अवघ्या १५ मिनिटात कंपनीजवळ पोहचलो....
![]() |
एस्सार कंपनी आणि त्याच्या समोरील लहान घर |
कंपनीच्या समोर ५० मीटर मागे एक लोखंडी गेट लावलेली खाजगी जागा दिसेल, त्यात बांधलेल्या लहान घराच्या मागून किल्ल्यावर जायला वाट आहे, हि खाजगी जागा सांभाळायाला त्या घरात श्री. दंशु आखाडे आणि त्याचे कुटुंब राहते, त्यांनी सांगितल्या प्रमाणे वाट घळीमधून वर किल्ल्यावर जाते... पायथ्यापासून किल्ला बिलकुल दिसत नाही त्यामुळे चढाई कशी असेल ते एक गूढच होते....
आम्ही घराच्या इथून चालायला सुरवात केली, काकांनी सांगितल्याप्रमाणे वाट जंगलातून जाते आणि नंतर घळीतून वर जाते, वाट एकदम मळलेली नसली तर कळण्याइतपत नक्की आहे...हळूहळू वाट घळीतून वर चढत होती, वाटेला बऱ्यापैकी घसारा होता...
![]() |
घळीमधील वाट |
वाटेत आमच्या एका सह्यमित्र प्रसाद कुलकर्णीने लॅमिनेट केलेले दिशादर्शक बाण लावल्याने वाट चुकण्याची शक्यता नव्हती... वाट तशी बऱ्यापैकी जंगलातून जात असल्याने सुरवातीला ऊन लागत नव्हते...२०
मिनिटात पठार लागले आणि समोर मोरगिरी किल्ला लगेच दिसत नाही तर किल्ल्याची उतरलेली सोंड दिसते ....तसेच आपल्या मागे तुंग किल्ला, तिकोना किल्ला आणि पवना जलाशय दिसतो....
![]() | |
विनय ... समोर देवधर डोंगर आणि मागे उंचावलेला तुंग किल्ला |
![]() |
मोरगिरी किल्ला आणि त्याच्याकडे जाणारी वाट |
पठारावरून आपण सरळ वाटचाल करायची मग हळूहळू संपूर्ण किल्ला दिसतो ..आम्ही थोडी विश्रांती घेऊन पठारावरुन चालायला लागलो... किल्ला हा तुमच्या उजवीकडे ठेवूनच सरळ वाटचाल करायची आहे...साधारण पठारावरून डावीकडे चालत असताना तुम्हाला लहानशी मळलेली वाट पकडायची हीच वाट किल्ला जवळ येतायेता नंतर मोठी होत जाते...साधारण २० मिनिटे चालल्यावर एक वाट उजवीकडे जंगलातुन वर घेऊन जाते, वाट सहजासहजी दिसत नाही, आम्ही सुद्धा चालण्याच्या नादात पुढे गेलो पण कुणालने लगेच थांबवले आणि 'किल्ल्याकडे' असा दिशादर्शक फलक दाखवला.... समोरून येणारी वाट ही पहिल्या वाटेला येऊन मिळत होती त्यामुळे आम्हाला तो फलक या बाजूने येताना दिसला नाही...तसेच तो फलक झाडांच्या फांद्यांमध्ये लगेच कळून येत नाही...
![]() |
ह्या फलकाकडे लक्ष ठेवा आणि वरती किल्ल्याकडे जाणारी वाट पकडा |
आम्ही किल्ल्याकडे जाणारी उजवीकडेची वाट पकडली...सुरवातीची वाट ही दाट जंगलातून आणि नंतरचा खडा चढ हा पूर्ण उन्हातून आहे, खडा चढ आणि घसारा ह्यामुळे आमची चाल चांगलीच मंदावली होती...साधारण 20 मिनिटात आपण किल्ल्यावर पोहचलो...खडा चढ चढून आल्यावर एक बाजूला माथ्यापासून खाली उतरलेली एक चिंचोळी घळ दिसते आणि खाली काही दगडांना शेंदूर फासलेला दिसतो, पुढे आपल्याला एक मागोमाग 3 कातळात खोदलेल्या टाक्या दिसतात, पहिल्या दोन टाक्या या अस्वच्छ आहेत, तर तिसऱ्या गुहासदृश्य टाकीच्या बाजूला जाखमाता देवीची (मोराई देवी) तांदळा स्वरुपातील मूर्ती आहे....गुहेच्या आत एका कातळावर जाखमाता मोठया अक्षरात लिहिले आहे...ह्या टाकीतील पाणी पिण्यायोग्य आहे...मंदिराजवळ सोलार लॅम्प लावला होता.
![]() |
बाणाने तीन टाक्या दाखवल्या आहेत |
![]() | |
बाणाने शिडी आणि वरती पायऱ्या दाखवल्या आहेत |
![]() |
जाखमाता देवीची तांदळा स्वरुपातील मूर्ती आणि तिसरी टाकी |
बाजूला मागच्या वर्षी सहयाद्री प्रतिष्ठानने १० फुटी शिडी लावल्याने किल्ल्यावर पोहचणे सोपे झाले आहे.
ही लहानशी शिडी चढून आपल्याला ६-७ पायऱ्या लागतात आणि वळसा घालून पुन्हा १०-१५ तुटक्या पायऱ्या चढल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो...गडमाथा हा अगदी आटोपता स्वरूपाचा आहे...
ही लहानशी शिडी चढून आपल्याला ६-७ पायऱ्या लागतात आणि वळसा घालून पुन्हा १०-१५ तुटक्या पायऱ्या चढल्यावर आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो...गडमाथा हा अगदी आटोपता स्वरूपाचा आहे...
माथ्यावर भगवा आपले स्वागत करतो... माथ्यावर दोन टाक्या आहेत, मोठी टाकी अजूनही पाणी राखून होती परंतु ते पाणी पिण्यायोग्य नव्हते आणि दुसरी लहान टाकी पूर्णपणे सुकलेली होती...
![]() |
किल्ल्याच्या गडमाथ्यावरील झेंडा, मोठी टाकी आणि लहान सुकलेली टाकी |
![]() |
कुणाल, विनय आणि पवना धरणाचा विस्तृत जलाशय |
किल्ल्यावरून आपल्याला एक बाजूला कोरीगड, अॅम्बी व्हॅली, अस्तित्व राखून असलेल्या देवराई, लांबलचक पसरलेले पठार तर दुसऱ्या बाजूला तुंग आणि तिकोणा किल्ला, पवना धरणाचा विस्तृत जलाशय असा नजरा दृृृष्टीस पडतो, वातावरण स्वच्छ असल्यास लोहगड आणि विसापूर सुद्धा दिसतात, हे सर्व नजरेत साठवून आम्ही गडफेरी आटपत उतरायला सुरुवात केली...किल्ल्याच्या चिंचोळ्या घळीतच जेवण केले आणि गुहेेेच्या टाकीतील पाणी भरून घेतले.....
![]() |
मार्च महिन्यात देखील सहयाद्रीने आपला हिरवा गालीचा पांघरून ठेवला आहे 😍 |
माझा विचार होता की जमल्यास तुंग किल्ला सुद्धा करूया, कारण माझा जरी तुंग अगोदर करून झाला असला तरी कुणाल आणि विनयचा करायचा बाकी होता... कुणालची तब्येत जरा बरी नसल्याने आणि विनय देखील उत्सुक नसल्याने त्या प्लॅनला तिकडेच रामराम केला आणि किल्ला उतरायला घेतला...
![]() |
माझे नेहमीचे साथीदार विनय, कुणाल आणि अस्मादिक 😆 |
आता खरी कसरत होती कारण घसारा जास्तच होता, त्यामुळे जमेल तिकडे बसून तो टप्पा पार करून खाली उतरलो...ज्या ठिकाणी आम्ही चुकून पुढे गेलो होतो तिथे दगडांनी व्यवस्थित वाट आखून ठेवली म्हणजे पुन्हा कोणी चुकणार नाही...अवघ्या पाऊण तासात आम्ही भराभर पायथ्याचे घर गाठले...कुठली गाडी येतेय का त्याची वाट बघत होतो पण रिसॉर्टला येणाऱ्या आलिशान गाड्या सोडून कुठलीच गाडी जात नव्हती, म्हणून नाईलाजाने १५ मिनिटाने आम्ही चालायला सुरुवात केली, साधारण दीड किमी चालल्यावर एक डंपरवाल्याला हात दाखवून थांबवले, आम्ही त्याला सुरवातीला फाट्यावर वर सोडशील का एवढंच विचारले होते, तो सुद्धा लोणावळाला काम संपवून जात होता, मग त्याला मी विचारून बघितले, त्याने सुद्धा लगेच होकार दिला....त्याच्यामुळे आम्ही लवकर लोणावळाला पोहचलो आणि मुंबईसाठी परतीचा प्रवास सुरु केला.
सह्याद्रीच्या सुदैवाने यावेळी कचरा गोळा करण्यासाठी नेलेली पिशवी बाहेर काढण्याची वेळच आली नाही 😊
तुम्हाला अजुन सोपा पडेल म्हणून कुणालने वीडियो सुद्धा काढला आहे, खाली त्याची Youtube लिंक दिली आहे. नक्की पहा.
https://www.youtube.com/watch?v=x7uDcsPEGvo&t=31s
सहभाग :
कुणाल कदम
विनय बिळगीकर
प्रणव मयेकर
थोडक्यात सुंदर माहिती, मस्त
ReplyDeleteछान एकदम
ReplyDeleteपाटण जवळ एक मोरगिरी किल्ला आहे त्याला गुणवंतगड या नावाने पन ओळखतात.
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteनवख्या ट्रेकर्सना मात्र खाली येताना अवघड जाईल असं तुमच्या या माहितीतून लक्षात येतेय ! तुम्ही आणखी थोडे याबद्दल प्रकाश टाकलात तर सोपे होईल !
ReplyDeleteHello Pranav, I will be going to Morgiri next week, can u just give me more details about the route? also I have read your and Kunal's blog, in his blog he has mentioned about Essar Agro tech nursery y and in your blog you have mentioned about Essar Agrotech company so which spot or place do we consider to take the route. Kindly guide.Thanks
ReplyDeleteHello Shailesh, Both are same place, So you can start your trek from the apposite side of the company.
DeleteFrom you more reference
Just follow this route from the below video:
https://www.youtube.com/watch?v=x7uDcsPEGvo&t=31s