ठाणाळे लेणी
ठाणाळे लेणी करायची खूप दिवस ठरत होते पण ऐनवेळी आम्ही नेहमी वेगळा प्लॅन करून दुसरीकडेच जायचो, आता पावसाळा आला होता, काही किल्ल्यांवर तर जायला देखील नको अशी परिस्थिती सध्या झाली आहे म्हणून आड वाटेचे ट्रेक्स करायला हवेत...
यावेळी सुरवातीला फक्त मी आणि कुणालच जाणार होतो, पण नंतर हेमेश आणि स्वप्ना देखील तयार झाले... सकाळची CST वरून ५.२० ला सुटणारी कर्जत पकडून नंतर कर्जत-खोपोली पकडून जायचे ठरवले, कुणालने करीरोड वरून, मी, हेमेश, स्वप्ना ने डोंबिवली वरून ट्रेन पकडली, ट्रेन कर्जतला ७.५० ला उशिरा पोहचली, दुसऱ्या प्लेटफॉर्मला ८.०० वाजताची कर्जत-खोपोली ट्रेन लागली होती, आम्ही ८.३० वाजता खोपोलीला पोहचलो.
स्टेशन बाहेरच हॉटेल मध्ये पेटपूजा करून आम्ही आमचा मोर्चा एसटी स्टँडकडे वळवला, स्टेशन बाहेर 5 मिनिटे चालत गेलात की एक एसटीचा थांबा लागतो, तिकडे आम्ही बराच वेळ पाली एसटीची वाट पाहिली, पण एसटी काही आली नाही... शेवटी स्टेशनपासून ३ किमीवर असलेल्या मुख्य एसटी डेपोत आम्ही शेअर रिक्षा करून निघालो, एसटी डेपोत पोहचल्यावर कळाले की ९.४५ पाली साठी एसटी आहे म्हणजे अजून अर्धा तास थांबण्याशिवाय गत्यंतर नव्हते, शेवटी ९.४५ ची एसटी १०.०० वाजता निघाली.
एसटी स्टँड ते पेडली अंतर साधारण २५ किमी आहे, खोपोली-पाली रस्त्याचे सध्या रुंदीकरणाचे काम चालू होते त्यामुळे लागलेल्या ट्राफिक मुळे आम्हाला पेडलीला पोहचायला बरोबर पाऊण तास लागला... पुढे पेडली ते ठाणाळे गाव हे अंतर अंदाजे ७ किमी आहे, पेडलीपासून ठाणाळे गावासाठी तुम्हाला शेअर मध्ये टमटम उपलब्ध असतात, पण आम्हाला अगोदरच पोहचायला उशीर झाल्याने आम्ही थेट ठाणाळे गावासाठी १५० रुपयाने टमटम ठरवली आणि त्याचा नंबर घेऊन परतीच्या प्रवासासाठी त्यालाच बोलावले.
![]() |
ठानाळे गावात - डावीकडून हेमेश, स्वप्ना, मी आणि मागे कुणाल |
रस्ता तसा पावसामुळे खराब असल्याने 20 मिनिटात आम्ही गावात पोहचलो, सुरवातीला गुगलबाबाची मदत घेऊन त्या वाटेने जायचा प्रयत्न केला पण गावातल्या काही लोकांनी तिकडून न जाण्याचे सांगितले (ही वाट नंतर बरोबर तुम्हाला नंतरच्या वाटेला येऊन मिळते) नंतर आम्ही गावात येेऊन विचारल्यावर त्यांनी आम्हाला दोन घरांच्या मधून जाणारी योग्य वाट दाखवली, आम्हाला गाईड घेण्याचा सल्ला दिला पण मला आदल्या दिवशी अमोघने गाईड न घेण्याचा सल्ला दिला होतो कारण या वाटेवर व्यवस्थित योग्य ठिकाणी बाण करून ठेवले होते त्यामुळे चुकण्याची शक्यता खूपच कमी होती.
घरामागून निघाल्यावर तुम्हाला ५ मिनिटात एका पठरावर येतात तिकडून उजवीकडील मळलेली वाट तुम्हाला लेण्यांपर्यंत घेऊन जाते, पावसाळ्यात तुम्हाला 3 ओढे पार करावे लागतात, आम्ही ज्या दिवशी जात होतो तेव्हा पाऊस तर नव्हताच पण कडक ऊन पडले होते, पावसाळ्यात ओढे पार करताना काळजी घ्या, इथे मच्छरांनी चावून चावून आमच्या नाकी नऊ आणले होते, स्वप्नाच्या हाताची तर अक्षरशः चाळण केली होती 😂 आम्ही पूर्ण बाह्यचे कपडे घालून सुद्धा त्यांनी आमचा काही पिच्छा सोडला नाही...साधारण एक-दीड तासात तुम्ही लेण्याजवळ पोहचाल...
ठाणाळे लेणी |
येथील सर्व लेणी पश्चिमभिमुख आहेत. या बौद्ध लेण्यांमध्ये एक चैत्यगृह, एक स्मारक स्तूप व एकवीस निवासी गुंफा आहेत. इ.स.पू. दुसऱ्या शतकात ठाणाळे लेण्याची निर्मिती झाली असावी.या लेणी साधारण आहेत आणि इ.स.पू. पहिल्या शतकातील आहेत. यामध्ये दोन चैत्य, दोन स्तूप आणि बाकीचे विहार आहेत. अलीकडच्या काळात ब्रिटिशांशी लढताना वासुदेव बळवंत फडके यांनी या लेण्यांमध्ये आश्रय घेतला होता.या लेण्यांमध्ये बौद्ध स्थापत्याचा प्रभाव दिसतो. त्यातील काही शिल्पे सुबक असून काही पूर्णावस्थेत नाहीत असेही दिसते. लेण्यांतील चैत्यविहाराच्या छतावर अप्रतिम नक्षीकाम आहे.
![]() |
चैत्यगृह |
आम्ही आमचे जेवण लगेच उरकून घेतले आणि बाकीची उरलेली लेणी पाहायला निघालो, ही लेणी जशी जशी तुम्ही पुढे पाहत जाल, तशी तशी तुम्हाला एक पायवाट पुढे जाताना दिसेल ही वाट पुढे जाऊन वाघजाई घाटाला मिळते, जर तुम्ही उजवीकडे जाऊन लेण्यांच्या माथ्यावर जाल तर तुम्हाला डावीकडे सुधागड आणि उजव्याबाजूला मध्ये दूरवर सरसगड दिसेल, खूप ट्रेकर्स सुधागड ते ठाणाळे लेणी किंवा उलट सुद्धा ट्रेक करतात...हा परिसर हा अत्यंत शांत आहे, पक्षी आणि दूरवर पडणाऱ्या धबधबाच्या आवाजाशिवाय ही शांतता भंग करायला आम्ही फक्त चौघेच जण तिकडे होतो...
![]() | |
डाव्याबाजुला सुधागड आणि उजव्या बाजूला सरसगड |
वरील सर्व मनमोहक दृश्य पाहून आम्ही काढता पाय घेतला, थोडावेळ ओढ्यावर आम्ही वेळ काढला आणि झपाझप पावले टाकत उतरायला घेतले... अवघ्या अर्ध्या तासात आम्ही गावात पोहचलो, टमटम वाल्या काकांना फोन करून अगोदरच बोलवून घेतले होते, आम्ही जास्त वेळ न दवडता पुन्हा पेडली कडे रवाना झालो, पेडली वरून पनवेलची एसटी पकडून खोपोली एसटी डेपोत उतरलो, तिकडून पुन्हा रिक्षा करून खोपोली स्टेशनला पोहचलो, आमची 6 ची गाडी ५ मिनिटांसाठी चुकली होती त्यामुळे स्टेनशवर दीड-दोन तास काढण्याशिवाय पर्याय नव्हता... मग नंतर 8 ची खोपोली-कर्जत ट्रेन व नंतर कर्जत-सीएसटी ट्रेन पकडून घरी पोहचलो...
ठाणाळे लेणी: खोपोली-पेडली-ठाणाळे गाव
सहभाग:
हेमेश तांडेल
स्वप्ना सावंत-तांडेल
कुणाल कदम
प्रणव मयेकर
कुणालने ह्या ट्रेकचा Video काढला आहे, खाली त्याची लिंक दिली आहे, नक्की पहा. धन्यवाद 🙏
https://youtu.be/weQU8ljzcxc
कुणालने ह्या ट्रेकचा Video काढला आहे, खाली त्याची लिंक दिली आहे, नक्की पहा. धन्यवाद 🙏
https://youtu.be/weQU8ljzcxc
मस्त प्रणव,
ReplyDeleteShort and sweet
प्रत्येक ट्रेक वा कुठे visit नंतर, असेच चालू ठेव blog लिहिणे,
Awesome Pranav.i miss those days.
ReplyDeleteKhup channn..mast
ReplyDeleteMast!👍
ReplyDelete