कामणदुर्ग किल्ला


ठाणे जिल्ह्यातील उंचीत दुसर्‍या क्रमांकावर असलेला किल्ला -
कामणदुर्ग
 ट्रेक दिनांक : २९ -०७ - २०१८ 
शक्यतो आम्ही पावसात किल्ले करत नाही कारण धुक्यामुळे आणि वाढलेल्या झाडी-गवतामुळे किल्ल्यावरचे अवशेष शोधायला कठिण होऊन जाते तसेच धुक्यामुळे किल्ल्याचे भौगोलिक स्थानच नीट कळत नाही पण काही किल्ले मी आता सर्व मोसमात करायचे ठरवले आहे, त्यात मृगगड उन्हाळ्यात आणि मागच्या आठवड्यात भर पावसात केला त्यात पावसात सह्याद्री खूपच सुंदर हिरवाईने सजलेला असतो म्हणून यावेळी आमचा कित्येक दिवस राहिलेला कामणदुर्ग करायचे ठरवले...... नेहमीच्या ग्रुप मध्ये विचारून बघितले पण नेहमीप्रमाणे मी आणि कुणालच तयार झालो, बाकीच्यांचा हा ट्रेक करून झाला होता, तर काही जण दुसऱ्या ट्रेकला जात होते ..... कुणालने त्याच्या मित्र नंदूला विचारले आणि तो सुद्धा तयार झाला, नंदूबरोबर गेल्यावर्षी पालघरचा काळदुर्ग केला होता त्यांनतर तो काही बाकीच्या ट्रेकला आला नव्हता, कामणदुर्ग वर असलेल्या रॉक पॅच मुळे त्याचे शेवटपर्यंत हो-नाही चालले होते, परंतु तो शेवटी ट्रेकला आला, तो आला नसता तरी आम्ही दोघांनीच हा ट्रेक करायचे ठरवले होते.

कामणदुर्ग तुम्हाला दिवा-वसई मार्गावर असलेल्या कामणरोड स्टेशनवर उतरून तिथून सुद्धा करता येतो, पण कामणरोड स्टेशन हे सकाळच्या वेळी सुनसान प्रकारचे असल्याने आणि तसेच भिवंडी-वसई  महामार्गावरून कामणसाठी रिक्षा मिळण्याचे वांदे असल्याने आम्ही वसईवरूनच जायचे ठरवले होते....त्याप्रमाणे मी डोंबिवलीवरून सकाळी ५.३५ वाजता डोंबिवली-बोईसर ट्रेन पकडून कामणरोडला न उतरता वसईला ६.३५ ला उतरलो.... तिकडून कुणाल आणि नंदू सुद्धा वसईला ६.३५ ला आले होते... आम्ही वसईवरून एसटीने कामणला उतरून तिकडून चालत किंवा रिक्षाने देवकुंडी मार्गे ट्रेक करणार होतो.

तिकडे दादरला कुणालला त्याचे काही जुने ट्रेकमित्र भेटले योगायोगाने ते सुद्धा नायगाव मार्गे कामणदुर्गला जात होते, कुणालने त्यांना आमच्याबरोबर ट्रेक करण्याचा सल्ला दिला आणि ते तयार झाले..... आम्ही स्टेशनबाहेरच असलेल्या एसटी स्टँडवर कामणसाठी एसटीची चौकशी केली आणि पेटपूजेसाठी स्टँडबाहेर पडलो.... जेे मिळेल ते खाऊन आम्ही एसटी स्टँडवर पुन्हा आलो..... ७.१५ ची जळगाव एसटी वसई-भिवंडी महामार्गावरुन कामण करत जाते..... कुणालचे मित्र सुद्धा आम्हाला स्टँडवर भेटले, आता आम्ही ७ जण झालो होतो.....हाय हॅलो करत ओळ्खपरेड लगेच झाली.

तेवढ्यात आमची वसई-जळगाव एसटी आली, एसटी ड्रायवरच्या अंगात जणू मायकल शुमाकर आल्याप्रमाणे गाडी चालवत आम्हाला अवघ्या १५ मिनिटात कामणला पोहचवले.... इथे उतरल्यावर ३ किमी वर असलेल्या देवकुंडीला चालत जायचे की रिक्षाने हा यक्षप्रश्न पडला...त्यात रिक्षावाले अवाच्या सव्वा भाव लावत होते त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एकमताने पायथ्याचे गाव देवकुंडी पायीच गाठण्याचे ठरवले....
कामण पासून साधारण ३ किमी वर असलेले देवकुंडी गाव

साधारण अर्ध्या तासात आम्ही देवकुंडी गावात पोहचलो, मी जेव्हा माहिती काढली होती तेव्हा सर्वांनी मला किल्ल्यासाठी वाटाड्या घ्यायला सांगितले होते मग गावात आम्ही वाटाड्या साठी विचारले, इथे सुद्धा सुरवातीला जास्त ५००-६०० रुपये मागत होते आणि आम्ही शेवटी कमी करून-करून २५० रुपये वर एक मुलाला यायला तयार केले .....७ जणांसाठी आम्हाला २५० योग्य वाटले...

सकाळचे ८.४५ वाजता आम्ही आमचा ट्रेक सुरू केला, त्या मुलाबरोबर अजून दोन लहान मुले सुद्धा आमच्या बरोबर यायला तयार झाली, आम्ही सात आणि ते तिघे असा आमचा १० जणांचा ताफा किल्ल्याकडे वळाला, फक्त सुरवातीची वाट सोडली तर बाकीची वाट ही व्यवस्थित जागोजागी बाण काढल्याने लगेच कळून येते, वाट ही देवकुंडी गावाच्या मागून सुरू होते, तुम्ही सुरवातीची वाट जरी गावातल्या लोकांना विचारून घेतली तरी चालेल पूर्ण वाटेसाठी वाटाड्या घ्यायची गरज नाही जर तुम्ही अनुभवी ट्रेकर्स असाल तरच....

पावसाळ्यात झाडी आणि गवत उगवलेले असल्यामुळे आम्हाला पायाखालची वाट नीट दिसत नव्हती...तर काही ठिकाणी गवत चांगलेच ५-६ फूट वाढले असल्याने समोरचे काहीच दिसत नव्हते पण हे काही सह्याद्रीमध्ये नवीन नाही....पायवाटेला बराच खडा चढ आल्याने मध्ये मध्ये ब्रेक घेऊन वरती चढत होतो, सकाळ पासून पाऊस काही पडत नव्हता त्यामुळे वातावरण चांगलेच दमट झाले होते...सगळे व्यवस्थित ट्रेकर्स असल्याने फटाफट चालत होतो... मला काल काहींनी अगोदर सांगून ठेवले होते की तुम्हाला बांबूचे घनदाट वन लागेल पण बांबूच्या वनाऐवजी इकडे रानटी केळीची झाडे जास्त होती, त्यांना सारखे बाजूला सारून वाट काढायला लागत होती... कामणदुर्ग किल्ला तुम्हाला देवकुंडी गावातून दिसत नाही, तुम्हाला कामण गावातून त्याचा माथा नक्की दिसेल....ट्रेक करत असताना तुम्हाला सुरवातीचे दीड तास तरी काही त्याचे दर्शन होणार नाही...

काही जण चांगलेच दमले होते कारण आम्ही जास्त न थांबता ट्रेक करत होतो, हा ट्रेक तुम्हाला नक्कीच थकवेल कारण पूर्ण ट्रेक हा खड्या चढणीचा आहे... शेवटी आम्ही एका मोकळ्या जागी आलो जिथून आम्हाला कामणदुर्गाचे पहिले दर्शन झाले आणि समजले की दिल्ली अजून खूप दूर आहे... एका ठिकाणी तुम्हाला एक दगडावर कामणदुर्ग लिहिलेले दिसेल म्हणजे तुम्ही योग्य वाटेवर आहात.... तिथून पुढे ५ मिनिटानंतर तुम्हाला वाट खाली उतरताना दिसेल...उतरल्यावर तुम्हाला कामणदुर्गची शेवटची अर्ध्या तासाची चढाई बाकी राहील...
सगळे पटपट चालत असल्याने कंटाळा येत नव्हता....शेवटी आम्हाला पहिला टप्पा लागला जिकडे किल्ल्याच्या पायऱ्या लागल्या... आणि पुढे जाऊन तुम्हाला किल्ल्यावरच्या पाच टाक्यांचा समूह दिसतो, एक टाकी सोडली बाकी कुठल्याच टाकीत पाणी नव्हते... पाणी हे बऱ्यापैकी पिण्यायोग्य होते....आम्हाला किल्ल्यावर असलेली मूर्ती कुठेच दिसली नाही, उतरताना जे दुसऱ्या गावतले गावकरी भेटले त्यानांदेखील त्या मूर्तीबद्दल काहीच महित नव्हते....

शेवटच्या टाकीत 'Bamboo Pit Viper' (मराठीत 'हिरवा चापडा') शांतपणे पहुडलेला कुणालला दिसला, त्या उत्सवमूर्तीचे फोटो काढण्यातच आमचा बराच वेळ वाया गेला 😂
नंदूचे बूट फाटल्याने आणि पुढे रॉक पॅचेस असल्याने त्याने वरती येण्यास नकार दिला...आम्ही बाकीचे सर्वजण वरती निघालो पुढे तुम्हाला सोपे-मध्यम प्रकारचे ३ रॉक पॅचेस व पायऱ्या लागतील...शेवटच्या पॅच जवळ तुम्हाला किल्ल्याची लहानशी तटबंदी दिसेल...तुम्ही माथ्यावर पोहचला की एक आडवी पाण्याने भरलेली टाकी तुमचे स्वागत करेल....आम्ही बरोबर ११.१५ ला म्हणजे २.३० तासात किल्ल्याचा माथा गाठला होता ..... 

किल्ल्यावरील टाक्या
किल्ल्याचा माथा लहान असल्या कारणाने तुम्हाला जास्त अवशेष सापडणार नाहीत, माथ्याच्या डाव्या बाजूला काहीच नाही आहे, समोर एक लहानसा सुकलेला तलाव दिसेल... तुम्ही उजव्या बाजूला गेल्यावर तुम्हाला एक लहान सुकलेली टाकी दिसेल.... तसेच नीट पाहिल्यास एक गाळाने भरलेली लहान टाकी दिसेल..... पुढे तुम्हाला एका ठिकाणी झेंडा लावलेला दिसेल इथे खरा गडमाथा संपतो, पण पायवाट पुढे जात होती आम्ही अजून टोकावर गेलो....

तेवढ्यात ढग दूर झाल्याने आम्हाला समोरचा डोंगर दिसला, काहींच्या म्हण्यानुसार दुसऱ्या गावातून या डोंगरावर वाट येते, आम्ही काही ती पायवाट पूर्ण उतरून पहिली नाही, कुणाल वाट पाहायला खाली उतरत होता तेव्हाच त्याच्या बाजूने एक साप झाडीत अदृश्य झाला आणि कुणाल त्यामुळे परत आला... आम्ही सुद्धा आमचे फोटो काढून तिकडून काढता पाय घेतला, पुन्हा मागे येत असताना कुणालला वाटेत विंचू दिसला म्हणून आम्ही पुन्हा या आजच्या दुसऱ्या उत्सवमूर्तीचे फोटो काढण्यात मग्न झालो... नंतर एक मोकळी जागा पाहून आम्ही आमचे जेवण आटपून घेतले आणि १ वाजता किल्ला उतरायला सुरुवात केली.....

Bamboo Pit Viper & Giant Forest Scorpion

खाली नंदू आमची वाट पाहतच होता त्याला घेऊन झपझप पावले टाकत किल्ला उतरत होतो....सुदैवाने किल्ल्यावर किंवा पायवाटेवर प्लॅस्टिकचा कचरा नव्हता त्यामुळे उचलायला काहीच जास्त भेटले नाही, तो वेळ वाचल्याने लवकर खाली उतरलो.

अवघ्या दोन तासात आम्ही देवकुंडी गावात पोहचलो होतो, ३ वाजले होते त्या मुलांना त्यांचे पैसे देऊन त्यांना मोकळे केले... आम्ही पुन्हा कामण गावाकडे मोर्चा वळवला, ३ किमी चालतच कामण गाठले, कामण वरून लगेच एसटी पकडत वसई स्टेशनला पोहचलो आणि आपआपल्या घराकडे सुखरूप पोहचलो.

कामणदुर्ग : डोंबिवली - वसई - कामण- देवकुंडी܂

सहभाग: 
नंदकुमार जाधव 
कुणाल कदम
अभिषेक मठकर आणि त्याचे ३ मित्र
प्रणव मयेकर

कुणालने ह्या ट्रेकचा Video काढला आहे, खाली त्याची लिंक दिली आहे, नक्की पहा. धन्यवाद 🙏



Comments

  1. अप्रतिम प्रणव
    छान लिहितोस

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मोरगिरी किल्ला

कुर्डूगड मानगड स्वारी