सिन्नरची मुशाफिरी
सिन्नर रेंज कधीपासून करायची होती... कशी आणि कोणाबरोबर करायची तेच कळत नव्हते, माहिती अगोदरच काढली होती.. शेवटी संपुर्ण माहिती काढून प्लॅन बनवला, बाकीची माहिती मी अमित बोरोलेचे पुस्तक 'दुर्गभ्रमंती नाशिकची' यातून घेतली. तारीख २५-२७ मार्च ठरवली त्यात ६ किल्ले आणि ४ मंदिरे करायचे ठरवले.. नेहमीप्रमाणे विनयची काहीतरी अडचण आली आणि त्याने सुरवातीलाच माघार घेतली.. मग नेहमीच्या ट्रेकिंगवाल्या व्हॉट्सप ग्रुपवर विचारुन बघितले आणि कुणाल कदम ,हेमेश तांडेल ,प्रसाद नायकने लगेच होकार दिला, एखादी लहानशी गाड़ी करुन ट्रेक करायचे ठरवले, लगेचच मी आमचा नेहमीचा रथसारथी असीमला फोन करुन त्याची गाडी बुक केली.
निघायचा दिवस आला,सगळे गुरुवारी ऑफिस मधून लवकर घरी आणि घरी जाऊन रात्री 12 वाजता ठाणे स्टेशनला भेटले, असीम त्याची इंडिका घेऊन आलाच होता.मुंबई-नाशिक महामार्गावर नेहमीप्रमाणे 10 मिनिटासाठी चहासाठी कसाऱ्याला थांबलो आणि तडक नाशिक शहर पार करून सिन्नर बसस्थानकडे पुन्हा थांबा घेतला, तेवढंच सिन्नर बसस्थानक आम्ही फिरून घेतले. मला नेहमीप्रमाणे गाडीत काही झोप येत नव्हती, जिपिएस चालू केला,सोनगड आणि पर्वतगडच्या पायथ्याचे गाव सोनेवाडीला 5.30 वाजता पोहचलो,अजून सूर्याचे दर्शन होण्यास वेळ असल्याने एका मंदिराजवळ गाडी लावली आणि मंदिरातच झोप काढायची ठरवले, बाहेर बरीच थंडी होती त्यात मी स्लिपिंग बॅग आणली नव्हती म्हणुन माझ्या झोपेचे खोबरे होणार हे त्यात आपसूक आलेच.कशीबशी 10 मिनिटे झोप काढली आणि उठून बसलो. 6.30 वाजले आणि थोडे उजडायला आले होते, बाकीच्यांना सुद्धा आवरायला सांगितले, मोठी बॅग गाडीत ठेवून लहान बॅग घेतली, गाडी आणल्याचा अजून एक काय तो उपयोग.😉
![]() |
डावीकडचा सोनगड आणि उजवीकडे पर्वतगड |
इथे सुरवातीलाच मी मोठा घोळ घातला,कॅमेऱ्याची लेन्स जरा जास्तच साफ करता करता माझा कॅमेराच बंद पडला आणि माझा मात्र मूड गेला.पण ट्रेक महत्वाचा असल्याने मोबाईलने फोटो काढायचे ठरवले,पर्वतगड आणि सोनगड समोरासमोर असल्याने दोन्ही किल्ले लवकर होणार होते, पहिला सर्वानुमाते पर्वतगड करायचा ठरवला, पर्वतगडाला अशी मळलेली वाट नसल्याने थोडा घोळ झालाच, थोडे चढल्यावर लहानशी सपाटी लागते तिकडूनच उजव्या बाजूची वाट पकडली आणि ती वाट बरोबर पर्वतगडावर घेऊन जाते, हेमेश वाट शोधत अगोदरच किल्ल्यावर पोहचला होता, आम्ही बाकीचे सुद्धा किल्ल्यावर आलो आणि अवशेष शोधायला लागलो,
एक पावसाळी तलाव आणि 2 टाक्या सोडून बाकी काहीच अवशेष नव्हते,पण किल्ल्यावरून सोनगड आणि बाजूला असलेल्या भोजपुर धरणाचे विहंगम दृश्य दिसत होते, डाव्याबाजूने दूरवर आडचा किल्ला आणि बाजूला पवनचक्कीची रांग दिसत होती, सगळे डोळ्यात भरून आम्ही दुसऱ्याबाजूने उतरायचा केविलवाणा प्रयत्न केला, एक 10-15 फुटाचा अवघड रॉकपॅच उतरायचं आल्याने माघार घेतली,इथेच आमचा एक तास फुकट गेला...
पुन्हा किल्ल्यावर आलो, पोटात कावळे ओरडायला लागले होते म्हणुन जे आणले होते त्यावर आडवा हात मारला, क्षुधाशांती झाल्याने किल्ला आलेलो त्या मार्गाने झपाझप उतरायला सुरुवात केली,पुन्हा सपाटीवर आलो,ज्या मार्गाने आलो होतो तिकडे घसारा जास्तच होता म्हणुन दुसऱ्या बाजूने सोनगडच्या समोर असलेल्या घळीतून उतरायला सुरवात केली ही वाट त्यातल्या त्यात तुलनेने सोपी होती.. आता पुढचे टार्गेट होते सोनगड किल्ला, पर्वतगड उतरणाच्या नादात बराच वेळ फुकट गेला असल्याने सोनगड शक्य तितक्या लवकर करण्याचे ठरवले,10.30 वाजले होते आणि लवकरच सोनगडच्या पायऱ्या लागल्या. अवघ्या 15 मिनिटत सोनगडच्या माथ्यावर पोहचलो,समोरच लांबच्यालांब पसरलेला अजस्त्र पर्वतगड दिसत होता,गडावर लहानसे मंदिर होते आम्ही त्याच्याच आडोशाला 10 मिनिटे बसलो, आता ऊन चांगलेच डोक्यावर आले होते, मंदिरात कुतुहूल निर्माण करणारी बुद्धा सारखी मूर्ती ठेवली होती, मंदिरामागे गढुूळ पाण्याचे टाके आहे,त्यामुळे हे दोन्ही किल्ले करताना पाण्याचा योग्य साठा स्वतःकडे ठेवावा किंवा सोनेवाडीत पाणी भरून घ्यावे ...किल्ला पाहून आता उतरायला सुरुवात केली आणि 20 मिनिटात सोनेवाडीत पोहचलो...गावात कुणालने पाणी भरून घेतले, उन्हाळ्याचे दिवस असल्याने आम्ही गाडीत 15 लिटरचा अगोदरच साठा करून ठेवला होता...
आता गाडी थेट आजच्या तिसऱ्या किल्ल्याकडे ठाणगाव मार्गे वळवली, लोकांना विचारात विचारात गाडी आडगडाकडे नेत होतो, रस्ता विचारता विचारता एकाठिकाणी उसाच्या रसाची गाडी लावलेली दिसली, मग तिकडेच थोडावेळ आम्ही रसासाठी बस्तान मांडून बसलो.. प्रत्येकी २-3 ग्लासाचे घोट घेऊन निघालो आणि सकाळपासून धड असे काहीच खाल्ले नव्हते,म्हणुन गाडी नाश्त्यासाठी हॉटेल कडे वळवली...भरपेट नाश्ता करून गाडी आडवाडीकडे असीमने पळवली,आडवाडी येण्यापूर्वी सुजलॉन कंपनीने लावलेल्या भल्यामोठ्या पवनचक्या तुमचे आ वासून स्वागत करतात,कमी रहदारीचा रास्ता आणि बाजूला पवनचक्क्या त्यामुळे तुम्हाला फोटो काढण्याचा मोह तर नक्कीच होईल,आम्ही तो नाईलाजाने टाळून साधारण २ वाजता आडगडच्या पायथ्याला असलेल्या आडवाडीत पोहचलो,खाली गावात वाट विचारली आणि पुढे चढायला सुरुवात केली,
इकडेसुद्धा बऱ्याच ढोरवाटा फुटल्या असल्याने वाट चुकलो,खालून एका शेतकरीबाईने आम्हाला इशाऱ्याने वाट दाखवली. वाट तुलनेत सोपी असली तरी प्रसादचे सकाळप्रमाणे पाय लटपटत होते.. कसाबसा त्याला धीर देऊन आम्ही वरती चढत होतो आणि ३० मिनिटात आम्ही गडावर पोहचलो, किल्ल्यावर खोदीव टाकींची कमतरता नव्हती...गाववाल्यांनी नुकतेच गडावरचे गवत जाळून ठेवल्याने सगळीकडे जमीन करपट दिसत होती, २.३० वाजले होते,मार्च महिन्याचा उन्हाचा तडाखा प्रसादला अगोदरच बसला होता...कुठे अवदसा आठवली आणि या ट्रेकला हो म्हणालो असा काही प्रसादचे झाले होते, हेमेश सुद्धा उन्हामुळे वैतागला होता त्यामुळे गडावरचा उध्वस्त दरवाजा मी आणि कुणालच बघून आलो...
एक पावसाळी तलाव आणि 2 टाक्या सोडून बाकी काहीच अवशेष नव्हते,पण किल्ल्यावरून सोनगड आणि बाजूला असलेल्या भोजपुर धरणाचे विहंगम दृश्य दिसत होते, डाव्याबाजूने दूरवर आडचा किल्ला आणि बाजूला पवनचक्कीची रांग दिसत होती, सगळे डोळ्यात भरून आम्ही दुसऱ्याबाजूने उतरायचा केविलवाणा प्रयत्न केला, एक 10-15 फुटाचा अवघड रॉकपॅच उतरायचं आल्याने माघार घेतली,इथेच आमचा एक तास फुकट गेला...
![]() |
पर्वतगड आणि दिसणारा लहानसा सोनगड |
![]() |
सोनगड आणि त्यावरील वास्तू |
![]() |
१) आडवाडीतून दिसणारा आडगाड २) किल्ल्यावरील खोदीव टाकीं ३) गडावरचा उध्वस्त दरवाजा ४)आडुबाईची गुहा आणि मंदिर |
आता मला आडुबाईची गुहा शोधायची होती, खूप वेळ शोधून सुद्धा मला आणि कुणालला काही वाट सापडत नव्हती, इकडे प्रसाद गड उतरायला सांगत होता, पण गुहा शोधल्याशिवाय खाली उतरणार नाही असे मी सांगितले आणि पुन्हा गुहा शोधायला सुरवात केली...तेवढ्यात कुणालाचा गुहेकडे जाणाऱ्या पायऱ्या सापडल्याचा आवाज आला आणि सगळे तिकडेच वळलो,प्रसाद सुद्धा नाईलाजाने तयार झाला...गुहेच्या वाटेने जात असताना आडुबाईच्या दर्शनाला दुसऱ्या वाटेने आलेली काही लहान मुले आणि माणसे भेटली...पायऱ्या तुटलेल्या अवस्थेत असल्याने इथे सुद्धा प्रसादने का कू करायला सुरुवात केली, त्याला कसबसे खाली उतरवले, गुहेकडी जाणारी वाट अरुंद असल्याने ती जरा जपूनच पार करावी लागते...
५०-६० माणसे आरामशीर झोपतील एवढी गुहा प्रशस्त होती, गुहेत गावकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आडुबाईची मूर्ती होती...गुहेतच कडेला एक खोली बनवण्यात आली होती..बाजूला असलेल्या टाकीत गढूळ पाणी संपायला आले होते. इकडे हेमेशने आणलेल्या व्हेज पुलाववर आम्ही ताव मारला आणि त्यानंतर बाकीच्यांनी थोडीशी डुलकी काढली आणि १५ मिनिटाने गडावरून सुरुवात केली, गुहेजवळचा अरुंद रस्ता आणि तुटक्या पायऱ्या चढून वर आलो....आलो त्याच मार्गाने उतरायला सुरुवात केली,इथे पुन्हा प्रसादला मदत करून गाडीजवळ ५ वाजता पोहचलो. आजचे 3 किल्ले योग्य वेळेत झाल्याने समाधान वाटत होते.जाताना पवनचक्क्या जवळ ग्रुप फोटो घेतला.
![]() |
डावीकडून मी, हेमेश, कुणाल, रथसारथी असीम आणि प्रसाद |
या पवनचक्कयामुळे गाडी रास्ता व्यवस्थित होता,पुन्हा ठाणगावचा रस्ता गाडीने घेतला आणि ६ वाजता डुबेरवाडीतल्या बर्वेवाड्यात थांबलो. डुबेरवाडी म्हणजे पराक्रमी थोरले बाजीरावांचे जन्मगाव.या डुबेरवाडीतल्या बर्वे घराण्यातील मुलीचे बाळाजी विश्वनाथांसोबत लग्न झाले आणि तिच्या पोटी थोरले बाजीराव जन्मले ते या बर्वेवाड्यात, वाड्यात पोहचलो तेव्हा त्यांचे वंशज तिथे नव्हते.. त्यामुळे बाजीरावच्या जन्माची खोली बघायला मिळाली नाही, सुदंर कलाकुसर असलेल्या या ऐतिहासिक वाड्याचे फोटो काढून आम्ही सिन्नरला मुक्कामासाठी परतलो.
दुसरा दिवस
सकाळी सगळे लवकर उठलो आणि नाश्ता करून तडक गाडी डुबेरगडाकडे पळवली आणि डुबेरगडाच्या पायथ्याला असलेल्या नागेश्वर मंदिराकडे थांबवली, गडावर सप्तशृंगी मातेचे देऊळ असल्याने गडावर जायला व्यवस्थित पायऱ्या आहेत...गडावर आपण अवघ्या 20 मिनिटात पोहचतो, उजव्याबाजूला दोन पाण्याची टाक्या दिसतील आणि समोर सप्तशृंगी देवीचे मंदिर दिसेल, मंदिरात देवीचे दर्शन घेऊन आम्ही बाकीचा गड बघायला निघालो, एकेठिकाणी गणपतीचे लहानसे मंदिर बांधले होते... नेहमीप्रमाणे इथेही काही पीर बाबाचे बांधकाम केलेलं होतेच, पुढे पावसाळी तलाव नावाप्रमाणे सुकलेला होता.. अजून कुठे गडाचे अवशेष दिसले नाही म्हणून गड उतरायला सुरवात केली आणि 10 मिनिटात खाली आलो.. आम्हाला एवढ्या लवकर आलेलो बघून असीम सुद्धा चाट पडला, मुळात गडावर जास्त अवशेष नसल्याने गड लवकर बघून झाला होता. हेमेश आणि कुणाल सकाळची राहलेली कामे करायला झुडुपात गडप झालेत, मी सुद्धा तेवढा वेळ मंदिरात काढायचा विचार केला.. तेवढी 10 मिनिटे शांतता अनुभवल्यावर मी वेगळ्याच विश्वात गेलो होतो आणि त्यात खंड पाडला तो प्रसादच्या आवाजाने' "प्रणव, चल निकलते है", नाईलाजाने मी निघालो.
![]() |
पराक्रमी थोरले बाजीरावांचे जन्मस्थान - बर्वेवाडा |
दुसरा दिवस
सकाळी सगळे लवकर उठलो आणि नाश्ता करून तडक गाडी डुबेरगडाकडे पळवली आणि डुबेरगडाच्या पायथ्याला असलेल्या नागेश्वर मंदिराकडे थांबवली, गडावर सप्तशृंगी मातेचे देऊळ असल्याने गडावर जायला व्यवस्थित पायऱ्या आहेत...गडावर आपण अवघ्या 20 मिनिटात पोहचतो, उजव्याबाजूला दोन पाण्याची टाक्या दिसतील आणि समोर सप्तशृंगी देवीचे मंदिर दिसेल, मंदिरात देवीचे दर्शन घेऊन आम्ही बाकीचा गड बघायला निघालो, एकेठिकाणी गणपतीचे लहानसे मंदिर बांधले होते... नेहमीप्रमाणे इथेही काही पीर बाबाचे बांधकाम केलेलं होतेच, पुढे पावसाळी तलाव नावाप्रमाणे सुकलेला होता.. अजून कुठे गडाचे अवशेष दिसले नाही म्हणून गड उतरायला सुरवात केली आणि 10 मिनिटात खाली आलो.. आम्हाला एवढ्या लवकर आलेलो बघून असीम सुद्धा चाट पडला, मुळात गडावर जास्त अवशेष नसल्याने गड लवकर बघून झाला होता. हेमेश आणि कुणाल सकाळची राहलेली कामे करायला झुडुपात गडप झालेत, मी सुद्धा तेवढा वेळ मंदिरात काढायचा विचार केला.. तेवढी 10 मिनिटे शांतता अनुभवल्यावर मी वेगळ्याच विश्वात गेलो होतो आणि त्यात खंड पाडला तो प्रसादच्या आवाजाने' "प्रणव, चल निकलते है", नाईलाजाने मी निघालो.
![]() |
डुबेरगड, गडावरील सप्तशृंगी मातेचे देऊळ |
आजचे दुसरे लक्ष्य होते ते पट्टा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला विश्रामगड, या किल्ल्यावर महाराजांनी ८ दिवस विश्राम केला ,म्हणून या किल्ल्याचे नाव 'विश्रामगड' असे ठेवले... ठाणगावमार्गे आम्ही पट्टा किल्ल्याजवळ साधारण एका तासात पोहचलो...खायला काही सुद्धा न घेतल्याने आम्ही जवळच्या दुकानातून पारले-जी आणि राजगिऱ्याचे लाडू घेतले...किल्ल्याचा घेरा मोठा असल्याने 3-४ तास तर सहज जातील हे समजलो होतो, किल्ल्याचा ऐतिहासिक म्हत्व जाणूनच किल्ल्याची देखरेख योग्यप्रकारे ठेवली होती, ठिकठिकाणी किल्ल्याचा इतिहास आणि महत्वाच्या वास्तूबद्दल फलक लावले होते, जरा वर पोहोचताच तुम्हाला लक्ष्मण स्वामींची गुहा दिसेल ती फक्त पौर्णिमेला उघडतात असे ऐकले होते पण कुणालने जानेवरीतच विश्रामगडला अगोदरच फेरी मारली होती.. त्याने सांगितले कि बाजूच्या मोठ्या गुहेत असलेल्या गावकऱ्यांना विनंती केली तर ते गुहा बघायला देतात...त्याच्या सांगण्यानुसार आम्ही गावकऱ्यांना विनंती करून बघितली आणि त्यांनी आम्हाला आनंदाने गुहा पाहयला दिली, गुहेत भगवान शंकर,गणपती आणि जैनांचे तिर्थांकार दिगंबर यांच्या मूर्ती आहेत... गुहा पाहून झाल्यावर आम्ही त्यांचे आभार मानून आम्ही पुढच्या गडफेरीला निघालो...गुहेबाहेर माकडांचा लवाजमा आमच्या स्वागताला उभाच होताच, त्यांना कल्टी देऊन आम्ही आमची सुटका करून घेतली...वाटेत एका लहान गुहेत अष्टभुजा पट्टाईदेवीचे मंदिर लागले...पुढे दिल्ली दरवाजा लागतो,इथून पट्टेवाडीला उतरायला व्यवस्थित पायऱ्या आहेत,जवळच खांब टाके आहे...
आम्ही अंबारखान्याजवळ पोहचलो, अंबारखान्याचे रूपच पालटले होते, बाहेर प्रसन्न अशी शिवरायांची अर्धमूर्ती आणि बाजूला शोभेची झाडे लावली होती.. गूगलवरील इतर फोटोत अंबारखाना हा थोडा जीर्ण अवस्थेत दिसला होता आणि त्याचे सध्याचे रूप बघून मन भारावून गेले...आत शिवरायांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग फायबरच्या चौकटीत सुंदरप्रकारे साकारले होते आणि मध्यभागी शिवरायांची सिंहासनावर बसलेली मूर्ती होती आणि तसेच इतर ऐतिहासिक आणि भौगोलिक माहितीचे फलक होते, आम्ही हे सर्व पाहून पूढे निघालो..
![]() |
१) पट्टागडाचे प्रवेशद्वार २) लक्ष्मण स्वामींची बंद असलेली गुहा ३) अष्टभुजा पट्टाईदेवीचे मंदिर ४) दिल्ली दरवाजा |
आम्ही अंबारखान्याजवळ पोहचलो, अंबारखान्याचे रूपच पालटले होते, बाहेर प्रसन्न अशी शिवरायांची अर्धमूर्ती आणि बाजूला शोभेची झाडे लावली होती.. गूगलवरील इतर फोटोत अंबारखाना हा थोडा जीर्ण अवस्थेत दिसला होता आणि त्याचे सध्याचे रूप बघून मन भारावून गेले...आत शिवरायांच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग फायबरच्या चौकटीत सुंदरप्रकारे साकारले होते आणि मध्यभागी शिवरायांची सिंहासनावर बसलेली मूर्ती होती आणि तसेच इतर ऐतिहासिक आणि भौगोलिक माहितीचे फलक होते, आम्ही हे सर्व पाहून पूढे निघालो..
![]() |
अंबारखानाचे पालटलेले रूप |
पठारावर आलो तेव्हा वातावरण फारच धूसर असल्याने दुरवरचे अलंग-मदन-कुलंग असे जोडकिल्ले दिसत नव्हते,फक्त अंधुकसे कळसुबाईचे शिखर आणि हळूच डोके वर काढलेला बितनगड दिसत होता..आता पाण्याच्या जोड टाकींजवळ पोहचलो, पट्टा किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याचा जरा सुद्धा तुडवडा नाही आहे, एकामागोमाग एक अश्या जवळपास सर्वच जोडटाक्या ह्या मार्चच्या कडाक्याच्या उन्हातदेखील जवळपास काटोकाट भरलेल्या होत्या आणि पाणी देखील चवीला अतिशय मधुर..टाक्या बघून आम्हाला औंध किल्ल्यासमोर तोंड असलेल्या भग्न दरवाजाजवळ जायचे होते...दरवाजा दुरुन दिसत जरी नसला तरी त्याला असलेली मजबूत तटबंदीला नजरेत ठेवून चालत राहायचे, जोडटाक्यांपासून दरवाजाकडे यायला 15 मिनिटे लागतात, दरवाजा जरी ढासळलेल्या अवस्थेत असला तरी तटबंदी अजूनही मजबूत आहे... दरवाजाजवळच्या टाकीत गढूळ पाणी होते, तिकडून समोर औंध किल्ला आम्हाला साद घालत होता पण कोणालाही प्रस्तारोहणाचे कौशल्य अवगत नसल्याने तो आमच्या प्लॅनमध्ये नव्हता, त्यात आम्ही जरी करायचा ठरवला तरी प्रसादला कसे वर चढवणार यातच आम्ही त्याचा जास्त विचार केला नाही, इथून औंध आणि पवनचक्कीसाठी बनवलेल्या रस्त्याचे एवढे सुदंर दृश्य दिसत होते की त्याचे फोटो काढण्यातच आमचा बराच वेळ गेला,
![]() |
१) पट्टा किल्ल्यावरील टाक्या २) औंध किल्ल्यासमोरचा दरवाजा ३) औंध किल्ला आणि पवनचककया ४) डावीकडून मी, हेमेश आणि कुणाल |
१२.४५ वाजले होते.. आता स्वतःला आवरता घेऊन आम्ही पुन्हा किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेल्या आणि ट्रेकर्ससाठी आश्रयदान असलेल्या 2 गुहेचा शोध घ्यायचा होता, आम्ही उलट बाजूने गुहा शोधत असल्याने जरा वेळ लागला,पण हेमेशला त्या लगेच सापडल्या...ही गुहा तर 100 माणसे आरामशीर सामावतील एवढी मोठी होती त्यातल्या त्यात ह्या गुहेत नुकतेच पूर्वीचा जुना धान्यसाठा सापडला होता,त्यामुळे कुतुहुल चांगलेच वाढले होते... सकाळी नाश्ता केल्यापासून काहीच खाल्ले नव्हते, ते खाऊन घेतले.. सूर्याच्या कृपेमुळे बॅगेतील पाणी सुद्धा गरम झाले होते.. आता लगेच दुसरी गुहा बघून झाल्यावर लवकर उतरायचे होते, दुसरी गुहा म्हणजे 3 बिएचके फ्लॅटच होता, राहण्यासाठी अतिशय उत्तम, पुढच्यावेळी जेव्हा औंधकिल्ल्यावर येऊ तेव्हा इकडे राहण्याचा मी आणि हेमेशने पक्के ठरवले,
आता वेळ न दवडता लवकर उतरायला घेतले.. पुन्हा मंदिराजवळ माकडांची फौज माझ्या बॅगेवर हल्ला करायला आली,मी सुद्धा जरा घाबरलोच.. पण नंतर काठी उगारताच रागाने दातांची बत्तीशी दाखवत पळून गेली, तिकडून मी धूम ठोकली आणि लवकर खाली उतरलो... आजच्या दिवसातील डुबेरगड आणि पट्टा किल्ले झाले होते,
![]() |
ट्रेक्करसाठी आश्रयादान असलेल्या 2 मोठया गुहा |
आता दिवसातील शेवटचा किल्ला बितनगड बाकी होता. बितनगडला जायचा रस्ता आम्ही गावकऱ्यांना विचारात विचारात जात होतो...शेवटी आम्ही बितंगवाडीला पोहचलो तेव्हा दुपारचे २.१५ वाजले होते, बितनगड जरी त्यामानाने सोप्पा असला तरी त्याच्या पायऱ्या जपून चढाव्या लागतात असे वाचले होते, इकडे प्रसाद आम्हाला वैताग आणणार हे आम्हाला कालच्या आडगडला आलेल्या अनुभवावर कळाले होते, म्हणून नाईलाजाने मदतीला आम्ही गाईड घेण्याचे ठरवले, सकाळीपासून धड काही खाल्लेले नसल्याने गावात कुठे साध्या जेवणाची सोय होते ते मी पाहयला गेलो आणि एका घरात जेवणाची ऑर्डर देऊन आलो,
![]() |
१) बितनगड २) गडाच्या पायऱ्या ३) गडाची गुहा ४) पाण्याची टाकी |
बितंगवाडीतून किल्ला दिसत नाही आणि बितनगडला तशी गाईड ची गरज बिलकुल सुद्धा नाही आहे, किल्ल्यावर जाणारी वाट ही सरळसोट आहे, गडाच्या खालून दिसणाऱ्या किल्ल्याच्या पायऱ्या बघून आपली शेतातून वाटचाल करावी... साधारण ३० मिनिटात आपण किल्ल्याच्या पायरऱ्याजवळ पोहचतो, पेबच्या किल्ल्यावर जश्या लांबलचक निमुळत्या पाण्याच्या गुहा आहेत तशीच पाण्याची गुहा बितनगडच्या पायऱ्याजवळ आहे, इथे पायऱ्या चढताना आणि उतरताना प्रसादने जो गोंधळ घातला त्याला हसून आमची पुरती वाट लागली, त्याला प्रत्येक पायरीजवळ आधाराची गरज लागत होती, काका सुद्धा वैतागले होते पण नाईलाज होता म्हणुन त्यांनी त्याला कसाबसा वर चढवला, थोडयाफार ठिकाणी एक्सपोज असल्याने या पायऱ्या नवख्या ट्रेकरला जरा जपून चढाव्या आणि उतराव्या लागतात, प्रसादने तसे बऱ्यापैकी बाकीचे सहयाद्रीचे किल्ले केले असल्याने त्याचे हे रूप बघून आम्हाला आश्चर्य वाटत होते.. पायऱ्या चढून आल्यावर एक लहान ५-६ माणसे राहण्याजोगी गुहा लागते...फक्त किल्यावर पाण्याच्या टाक्या या हिवाळ्यातच आटत असल्याने जाताना गावात पाणी भरून निघायचे, पुढे निघाल्यास तुम्हाला दोन ओस पडलेल्या टाक्या दिसतील, प्रसाद इथेच आपलं अवसान गळून बसला आणि म्हणाला "तुम आगे जाओ मुझे नही जमेगा"..आम्ही मग तिघेच पुढचा किल्ला बघायचे ठरवले, आम्ही किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर सरकलो... अतिशय घसारा असलेली वाट होती, पाय ठेवला कि तो खाली सरकणारच अशी स्थिती होती,काका आरामशीर वरती चढत होते... कसेबसे आम्ही हा टप्पा पार पडला आणि वरती आलो, समोर सह्याद्रीचे रौद्र रूप आमच्या स्वागताला उभे होते, जसे रतनगडवर उभे राहून तुम्हाला कात्राबाईचे रूप दिसते, अगदी तसेच हुबेहूब इथून दिसत होते... दुपारची 3 जरी वाजले असले तरी अजून वातावरण धुसरच होते, वरून तुम्हाला कळसुबाई, त्यामागे अलंग-मदन-कुलंग दिसत होते, दुसऱ्या बाजूला शेणीतचा सुळका, पट्टा आणि औंध किल्ले दिसत होते..20 मिनिटे आम्ही इकडेच होतो ....
![]() |
१) बितनगडावरुन दिसणारा शेणितचा सुळका २) कळसुबाईचे शिखर आणि त्यामागे अलंग-मदन-कुलंग३) शेणितच्या दिशेला असलेल्या जोडटाक्या ४) टाकीत कोरलेली लहानशी गुहा |
पोटात कावळे ओरडत असल्याने खाली उतरायला सुरुवात केली,उतार तर अजून तीव्र असल्याने सगळ्यांची घाबरघुंडी उडाली, हेमेश आणि कुणालने आपले बुड टेकवूनच खाली आले, इथून काकांनी आम्हाला शेणीतच्या दिशेला असलेल्या दोन टाक्या दाखवायला नेले, इथे जाणारी वाट सुद्धा निमुळती असल्याने सावकाश पार केली, टाक्या ह्या सुकलेल्या होत्या,एका मोठ्या टाकीत लहानशी गुहा कोरून ठेवली होती,त्याचे प्रयोजन मात्र समजले नाही....टाक्या पाहून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो, प्रसादला घेऊन आम्ही पुन्हा गुहेत आलो,इथे प्रसादने त्याच्या बॅगेतून नासपतींची (pears) फळे काढली.. सकाळपासून भुकेल्या आम्हा पामरांना जणू पंचपक्वाने दिली आहेत असे झाले होते...प्रसादाचे किती आभार मानू आणि किती नाही असे आमच्या बाकी तिघांचे झाले होते. उपकाराची परतफेड म्हणून काय तर उतरतना मी प्रसादला "तुझी बॅग मी उचलतो" असे सांगितले 😂😂
प्रसाद पूर्ण पायऱ्या काकांबरोबर उतरून जात नाही तोपर्यंत आम्ही बाकी तिघे बसून राहिलो...कसाबसा प्रसाद काकांबरोबर उतरून गेला, मी सुद्धा दोन बॅग सांभाळून पटापट उतरलो...काकांना सुद्धा प्रसादला उतरवल्यावर अगदी लढाई जिंकल्यासारखे झाले होते, गावात आम्ही 20 मिनिटात पोहचलो, काकांना योग्य ते मानधन देऊन त्यांची रवानगी केली, जिकडे जेवणाची ऑर्डर दिली होती तिकडे हातपाय धुऊन जेवायला बसलो.भरपेट जेवल्यावर सगळ्यांना तरतरी आली... तसेच दिवसाचे तिन्ही किल्ले विनासायास झाल्याने आम्हा चौघांची स्वारी खुशीत होती, गावकऱ्यांना पुढचे रस्ते विचारून आम्ही बितंगवाडीतून मार्गस्थ झालो.
आता पुढचे लक्ष्य होते टाकेदमधील जटायू मंदिर आणि टाहाकारीमधील पुरातन जगदंबादेवीचे मंदिर....संध्याकाळ व्हायला आली होती, टाकेदला आम्ही मंदिरात पटकन दर्शन घेऊन पुन्हा मागे परतलो, प्लॅनमध्ये नसलेल्या जगदंबादेवीच्या दर्शनाला निघालो,अचानक ठरल्यामुळे रस्ता विचारात विचारात जात होतो,अंधार झाला होता, रस्त्यावर मिळणारा प्रत्येकजण 10 मिनिटांवर आहे,15 मिनिटांवर आहे असा सांगत होता, पण मंदिर काही येत नव्हते, शेवटी एका तिठयावर माणसाने सांगितले "डावीकडचा रास्ता ठाणगावला जातो आणि 5 मिनिटवर मंदिर आहे" थोडे हायसे वाटले..थोड्याचवेळात आम्ही मंदिराजवळ पोहचलो... मंदिरात सुरेख असे कीर्तन चालू होते,आम्ही तोपर्यंत देवीचे दर्शन घेऊन आतील मंदिराची कलाकुसर बघायला लागलो, मंदिराचा बाहेेरून नुकताच जीर्णोद्धार केला आहे असा वाटले,बाहेर उजेड नसल्याने मंदिर बाहेरून नीटसे पाहता आले नाही...40 मिनिटे आमची मंदिर बघण्यात गेली, अतिशय सुरेख आणि न-चुकवण्यासारखा पुरातन मंदिर पाहायला मिळयाल्याने दिवसाचा शेवट योग्य झाला...शिवाय कीर्तन एवढे चांगले होते काहीवेळ ते ऐकण्यातच घालवला
![]() |
टाहाकारीचे पुरातन जगदंबा मंदिर |
आता पुन्हा ठाणगावमार्गे आम्ही सिन्नरला निघालो, दुपारी उशिरा जेवल्याने कोणाला सुद्धा जास्त भूक लागली नव्हती, तरी सुद्धा एका घरघुती खानावळी सारख्या हॉटेल मध्ये आम्ही उदरभरण करायला गेलो, तिकडचे लाजवाब घरचे जेवण जेवून मन तृप्त झाले...
उद्याचा दिवस फक्त मंदिरे करायची आल्याने आम्ही निवांत होतो. दिवसभरात माझी जरा सुद्धा झोप न मिळल्याने कधी निद्रादेवीच्या आधीन झालो ते मला कळाले सुद्धा नाही.
दिवस तिसरा
आमच्या ग्रुपमध्ये एक बरे होते कोणीही सकाळी लवकर उठायला किरकिर केली नाही प्रत्येकजण लवकर उठून वेळेत आवराआवर करून तयार असायचा.आज दोन मंदिरे आणि गारगोटी संग्रहालाय पाहुन शक्य तितक्या लवकर मुंबईत पोहचयाचे होते. नाश्ता करून आम्ही सिन्नरमधील प्रसिद्ध असे गोंदेश्वर मंदिरकडे पोहचलो, आतापर्यंत ज्याचे फक्त फोटोज पहिले होते त्याहून ते अधिक सुंदर होते.
पूर्वी यादवांची राजधानी असलेल्या सिन्नर हे श्रीनगर म्हणून ओळखले जायचे..यादव चालुक्यांचे मंडलिक होते.मुख्य मंदिर एका भव्य तटात (तटबंदीत) बांधले आहे. संपूर्ण पंचायतन मंदिर एका उंच जोत्यावर उभारले आहे. हे शैव पंचायतन मंदिर आहे. प्रमुख मंदिर मध्य भागी, चार कोपऱ्यांमध्ये चार उपमंदिरे आहेत. नंदीला स्वतंत्र मंडप (मंदिर) करून दिला आहे. मंदिरावर भूमिज पद्धतीचे शिखर आहे. गोविंद यादव या राजाने मंदिर बांधले किंवा त्याच्या काळात मंदिर पूर्ण झाले. मंदिराचे मूळ नाव गोविन्देश्वर याचा अपभृंश झाला आणि आपण त्याला गोंदेश्वर म्हणतो. मंदिर 12 शतकाच्या मध्यवर पूर्ण झाले असावे. इथून पूर्ण मंदिर पाहून आम्ही 10 वाजता पुढचे पुरातन ऐश्वर्यश्वर मंदिर पाहयला निघालो..
ऐश्वर्यश्वर मंदिर हे सरस्वती नदीच्या काठी आहे. आज तीचा नाला झाला आहे. चालुक्य यांनी हे मंदिर बांधले. गोंदेश्वरच्या आधी साधारण 50 वर्ष अगोदर बांधले होते. वेसर पद्धतिचे शिखर असून ते कोसळले आहे. गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप आहे. सभामंडप खुला आहे, त्यात स्तंभ असून स्तंभांवर कोरिव नक्षीकाम आहे. अंतराळाला सुंदर मकर तोरण आहे. त्यात नटेश्वर शिव आहे.
ही दोन मंदिरे पाहून आम्हाला आता गारगोटी संग्रहालाय पाहायचे होते, तिकिटे काढून आम्ही ५ जण आत गेलो, आम्हाला व्यवस्थित माहिती सांगायला एक तेथील कर्मचारी होता, रंगीबेरंगी गारगोटी(Pebbles or Stones) पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो होतो, नेहमी ट्रेक करताना फक्त पांढऱ्या किंवा जास्तीजास्त लाल रंगाचे गारगोटी पहिले होते...नंतर त्यांनी त्याच्या दुकानात नेले, त्याचे एवढे व्यवस्थित समजवून सांगण्याचे कारण समजले..😉
उद्याचा दिवस फक्त मंदिरे करायची आल्याने आम्ही निवांत होतो. दिवसभरात माझी जरा सुद्धा झोप न मिळल्याने कधी निद्रादेवीच्या आधीन झालो ते मला कळाले सुद्धा नाही.
दिवस तिसरा
आमच्या ग्रुपमध्ये एक बरे होते कोणीही सकाळी लवकर उठायला किरकिर केली नाही प्रत्येकजण लवकर उठून वेळेत आवराआवर करून तयार असायचा.आज दोन मंदिरे आणि गारगोटी संग्रहालाय पाहुन शक्य तितक्या लवकर मुंबईत पोहचयाचे होते. नाश्ता करून आम्ही सिन्नरमधील प्रसिद्ध असे गोंदेश्वर मंदिरकडे पोहचलो, आतापर्यंत ज्याचे फक्त फोटोज पहिले होते त्याहून ते अधिक सुंदर होते.
![]() |
गोंदेश्वर मंदिर |
ऐश्वर्यश्वर मंदिर हे सरस्वती नदीच्या काठी आहे. आज तीचा नाला झाला आहे. चालुक्य यांनी हे मंदिर बांधले. गोंदेश्वरच्या आधी साधारण 50 वर्ष अगोदर बांधले होते. वेसर पद्धतिचे शिखर असून ते कोसळले आहे. गर्भगृह, अंतराळ आणि सभामंडप आहे. सभामंडप खुला आहे, त्यात स्तंभ असून स्तंभांवर कोरिव नक्षीकाम आहे. अंतराळाला सुंदर मकर तोरण आहे. त्यात नटेश्वर शिव आहे.
![]() |
ऐश्वर्यश्वर मंदिर |
![]() |
विविध रंगबिरंगी गारगोटी |
दिसले की विकत घेतले या प्रकारातला मी नसल्याने मी काहीच विकत घेतले नाही, बराच वेळ बाकी असल्याने कुणाल आणि प्रसाद त्यांचा वेळ खरेदी करण्यात सार्थ लावत होते, २.१५ तास तिकडे घालवल्यावर मला आणि हेमेशला वैताग यायला लागला होता, कशीबशी त्या दोघांची खरेदी संपली आणि आम्ही परतीच्या मार्गावर लागलो..वाटेत दुतर्फा अनेक द्राक्षेचे स्टॉल्स लावलेले दिसले..एका ठिकाणी गाडी थांबवून तिथे सगळ्यांनी बऱ्यापैकी खरेदी केली..स्वतःला आवरून आम्ही तडक मुंबईच्या दिशेने धूम ठोकली,मध्येच कसाऱ्याच्या जवळ असलेला लहानसा बळवंतगड करायचा विचार आला,पण मागे सगळे गाढ झोपलेले पाहून मी मनातल्या मनात प्लॅन रद्द केला आणि ४.३० ला ठाण्याला पोहचलो.
नाशिक मधल्या या रेंज ट्रेकने अनेक सुखद आठवणी दिल्या आणि मनात पुढल्या रेंज ट्रेकचे किल्ले सुद्धा ठरवले गॆले.
सागर पाटिलने मंदिराची ट्रेकपूर्वी आणि ट्रेकनंतर सुद्धा योग्य आणि थोडक्यात माहिती दिल्याने त्याचे शतश: धन्यवाद, तसेच यातील ४-५ फोटोज मी प्रसाद नायकचे वापरले आहेत त्यामुळे त्याचे सुद्धा धन्यवाद :)
सागर पाटिलने मंदिराची ट्रेकपूर्वी आणि ट्रेकनंतर सुद्धा योग्य आणि थोडक्यात माहिती दिल्याने त्याचे शतश: धन्यवाद, तसेच यातील ४-५ फोटोज मी प्रसाद नायकचे वापरले आहेत त्यामुळे त्याचे सुद्धा धन्यवाद :)
सहभाग:
कुणाल कदम
हेमेश तांडेल
प्रसाद नायक
प्रणव मयेकर
सुंदर माहितीपर लेख...👍
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteKamalch Kelit Bua Tumhi... Keep IT Up dear.
ReplyDeleteसध्या भाषेतला माहिती पूर्ण लेख . . . . . . . मला मदत नक्कीच होईल.
ReplyDelete